डेली पोस्टमार्टम न्यूज –
चंद्रपूर-5 डिसेंबर 2025 (सुशांत घाटे)
चंद्रपूर जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागावर भ्रष्टाचाराची सावली आजवर अनेकदा पाहायला मिळाली; पण यंदा चित्र काही वेगळंच आहे. अभीचंदन नी हिवाळी अधिवेशनाची चाहूल लागताच तालुक्यातील बार, देशी भट्ट्या, वाईन शॉप, आणि अवैध दारू विक्रेत्यांकडून “हफ्ता वसुलीची जंगी मोहीम सुरू केली आहे.”, असा कथित आरोप स्थानिक व्यावसायिकांनी केला आहे.
या प्रकरणात जो अभिचंदन अधिकारी नावारूपास येतोय, त्या अधिकाऱ्याची “तडाखेबाज प्रतिमा” जशी जिल्ह्यात पसरली आहे, तशीच त्याच्या कथित वसुलीच्याही चर्चा गल्लीत गल्लीत घुमत आहेत.
सूत्रांच्या सांगण्यानुसार, विभागातील काही मध्यमस्तरीय कर्मचारी आणि काही जुने दलाल—जितू, मेश्राम, आपटे, हेमंत, शिवाजी—हे गेल्या काही दिवसांत चक्क रात्रीची रात्री फिरकत वसुली मोहीम राबवत असल्याचे आरोप समोर आले आहेत.8 डिसेंबर आधी पूर्ण अवैध वसुली करण्याचे फर्मान देणाऱ्या कोल्हापुरी अभिचंदनला पैशाची विशेष सत्रात गरज असल्याचे सांगण्यात येत आहे. “हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधी खिसे भरा… वरून टार्गेट आलंय” असा संदेश स्वतः त्या अधिकाऱ्याकडून पोचल्याचा कथित दावा करीत काही व्यावसायिकांनी संताप व्यक्त केला आहे.
या अधिकाऱ्यावर महिन्याला सुमारे २० लाखांचा डल्ला मारला जातो असा भीषण आरोप फिरतोय. इतकंच नाही तर—अवलोकनात आणखी एक विचित्र किस्सा समोर आला आहे. कथित अवैध वसुली घेताना बनावट नोटांचे बंडल या अधिकाऱ्याच्या हातात आल्याची चर्चा गेल्या आठवड्यात जोरदार व्हायरल झाली होती.
विभागीय पातळीवर ही घटना “अफवा” म्हणून सांगितली गेली असली तरी, गल्लीत-चर्चा मात्र शांत बसण्याच्या मनःस्थितीत नव्हती.
या सर्व कथित धंद्यामुळे परिस्थिती इतकी चिघळली की संबंधित अधिकाऱ्याचे नाव विभागाच्या बोर्डवर जरी नियमाने असले, तरी आता “अवैध वसुलीचा चेहरा” म्हणून मोठ्या अक्षरांत झळकतोय, अशी बोचरी टीका व्यावसायिकांमध्ये ऐकू येत आहे.
दरम्यान, या प्रकरणावर विभागीय स्तरावर तपासाची फाईल उघडण्यात आली होती. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, उगवत्या मुंबईच्या सूर्यासारख्या तेजस्वी हस्तक्षेपाने… फाईलचा ‘कोल्हापुरी पॅटर्न’ लावण्यात आला—म्हणजेच “दहा पेट्या घाल, काम झालं समजा”—अशी अविश्वसनीय चर्चा जोरात आहे.
या चर्चेत सत्य किती आणि अफवा किती—हे अद्याप पडताळायचे असले, तरी विभागाच्या कारभाराबद्दल प्रश्नांची झड चालूच आहे.
🌟जिल्ह्यातील निरीक्षकांच्या तुकडीतच वादळ
जिल्ह्यातील दोन निरीक्षक आणि तीन दुय्यम निरीक्षकांवरही अवैध वसुलीत सक्रिय भूमिका बजावल्याचा कथित आरोप होत आहे. दलालांची तुकडी तर या वसुली मोहीमेचं “फ्रंटलाइन फोर्स” बनल्यासारखी दिसत असल्याचे बोलले जाते.
यामुळे विभागाचा कारभार अक्षरशः धो-धो पडत चालला असल्याची तक्रार वाढत आहे.
🍁लाचलूचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई—आणि परिणाम?
गत काही वर्षांत विभागातील अनेक कर्मचाऱ्यांवर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाया केल्या. काहींना अटक, काहींचे निलंबन, काहींचे तब्बल जप्त मालमत्ता तपासणीचे फाईल्स…
पण परिणाम? शून्य प्रभाव.
जिल्ह्यातील लोकांच्या म्हणण्यानुसार
> “या विभागावर कारवाई म्हणजे समुद्रात दगड टाकल्यासारखी—चलनाच नाही!”
🍁राजकीय प्रश्न–हिवाळी अधिवेशनात भडका?
आता सर्वात मोठा प्रश्न—फडणवीस सरकार या विभागाला चाप देणार का?
कारण याच मंत्रालयाचा कारभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे.
आणि मंत्रालयातच एवढा मोठा भ्रष्टाचाराचा ठोसर धावत असेल, तर मंत्रालयाची भूमिका काय राहणार?
हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा जोरात मांडला जाणार असल्याची माहिती चर्चेत आहे.
🍁अधिवेशनात “अवैध वसुलीचा महाखुलासा” संभव
विविध नागरी संघटना, व्यापारी संघ, आणि काही जनप्रतिनिधी या प्रकरणी तपशीलवार पुरावे सादर करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
जर हे पुरावे समोर आले, तर संपूर्ण विभागात “तांडव” उडू शकते, असा अंदाज व्यक्त होत आहे.
या विभागात भ्रष्टाचाराची कीड इतकी खोलवर गेलीय,
की आता औषध नव्हे—शस्त्रक्रिया लागणार…
अधिवेशन सुरू होऊ दे,
‘पोस्टमार्टम’ टेबलावर खरं रूप दिसणार!
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

