बल्लारपूर | डेली पोस्टमार्टम
बल्लारपूर शहरात कथितरित्या सुरू असलेल्या ऑनलाइन बिंगो आणि ऑनलाइन लॉटरीच्या वाढत्या जाळ्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेच्या तालुका अध्यक्षा कल्पना पोतर्लावार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक, बल्लारपूर पोलीस ठाणे यांना निवेदन देत शहरातील कथित बेकायदेशीर ऑनलाइन लॉटरी केंद्रांवर तातडीने धडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
मनसेच्या म्हणण्यानुसार, ऑनलाइन बिंगोच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या कमाईचे आमिष दाखवून कथित आर्थिक फसवणूक केली जात आहे. या प्रकारामुळे अनेक युवक, कष्टकरी आणि सामान्य कुटुंबे आर्थिक संकटात सापडत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
मनसेने शहरातील सर्व संशयित केंद्रांची चौकशी करून, बेकायदेशीर प्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करून हा व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली आहे.
यावेळी जनहित कक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेश भाऊ काळबांडे, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश भाऊ वासलवार, शहराध्यक्ष पियुष धुपे, वाहतूक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष नवाब शेख, शालूताई जोगे, जयश्री जोगे, शिखाताई दास आणि शशिकला जोगे उपस्थित होते.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

