Thursday, April 16, 2026
HomeBreaking News“देर आये, दुरुस्त आये!” — वादग्रस्त ठाणेदार संदीप एकाडे अखेर दुर्गापूर ठाण्यातून...

“देर आये, दुरुस्त आये!” — वादग्रस्त ठाणेदार संदीप एकाडे अखेर दुर्गापूर ठाण्यातून हद्दपार; पोलीस अधीक्षकांचा ‘कंट्रोल रूम’चा दणका

💢चंद्रपूर -सुशांत घाटे💢

चंद्रपूर जिल्ह्यात दीर्घकाळापासून वादांच्या भोवऱ्यात अडकलेल्या दुर्गापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप एकाडे यांना अखेर ठाण्यातून कार्यमुक्त करण्यात आले आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी अचानक आदेश काढत एकाडे यांची बदली थेट पोलीस नियंत्रण कक्षात केली आहे. “देर आये, दुरुस्त आये” अशी प्रतिक्रिया आता जिल्ह्यात उमटू लागली आहे.

जिल्ह्यात वादग्रस्त आणि मगरूर ठाणेदार म्हणून ओळख निर्माण झालेल्या एकाडे यांची ही दुसऱ्यांदा नियंत्रण कक्षात रवानगी झाली आहे. त्यामुळे हा जिल्ह्यातील असा पहिलाच पोलीस निरीक्षक ठरला आहे ज्याला दोनदा कंट्रोल रूमची हवा खावी लागली. पोलीस विभागातील अनेकांना हा आदेश म्हणजे शिस्तीचा चपराक असल्याचे मानले जात आहे.

एकाडे यांचे नाव आधीच अनेक वादांमुळे चर्चेत होते. कोरपना येथे एका युवकाला बेरी के नीचे गाणे म्हणत बेदम मारहाण केल्याचा आरोप त्यांच्या नावावर लागला होता. त्या घटनेनंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. लोकांमध्ये भीती आणि संताप निर्माण झाला होता.
पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा त्यांच्या मगरूर, अभद्र आणि सनकी वागण्याबाबत नाराजी असल्याच्या चर्चा सतत सुरू होत्या. अनेकांनी त्यांच्या वर्तनाविषयी तक्रारी केल्याचेही समोर आले होते. लोकशाही व्यवस्थेत पोलीस अधिकारी जनतेचे रक्षक असतात; मात्र एकाडे यांच्या कारभारामुळे पोलीस विभागालाच बदनामीची कीड लागल्याची भावना जिल्ह्यात व्यक्त होत होती.

दरम्यान, दुर्गापूर पोलीस ठाण्यातील भंगार साठा गायब झाल्याच्या प्रकरणाने देखील वातावरण तापले आहे. या प्रकरणाची चौकशी सध्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले करत असल्याची माहिती समोर आली आहे. या चौकशीचा धागा नेमका कुठपर्यंत पोहोचतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याचदरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार नागपूर परीक्षेत्राचे IG संदीप पाटील यांच्या कार्यालयातून देखील एकाडे यांना तीन इन्क्रिमेंट का थांबवू नयेत याबाबत कायदेशीर नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकाडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

दरम्यान, दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या नवीन जबाबदारीसाठी परीक्षाविधीन असलेले IPS अधिकारी गौरव कायंदे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तरुण आणि अभ्यासू अधिकारी म्हणून ओळख असलेल्या कायंदे पाटील यांच्या नियुक्तीमुळे दुर्गापूर परिसरात कायदा-सुव्यवस्थेला नवी धार मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!