“गृहराज्यमंत्र्यांचा शब्द हवेत विरला? SDPO राकेश जाधव यांच्यावर कारवाईचा ‘रिपोर्ट’ धूळखात; वडेट्टीवार-मुनगंटीवारांचा आक्रमक पवित्राही ठरला फोल?”
(चंद्रपूर-20डिसेंबर 2025):सुशांत घाटे
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात ज्या अधिकाऱ्याच्या निलंबनासाठी सत्ताधारी आणि विरोधक एका सुरात कडाडले होते, त्या ब्रम्हपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) राकेश जाधव यांच्यावर अद्यापही ठोस ‘कारवाई’ न झाल्याने आता सरकारच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी भर सभागृहात दिलेला शब्द अखेर “मातीत गेला की काय?” असा संतप्त सवाल आता ब्रम्हपुरीची जनता आणि राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे.
🌻अधिवेशनातील तो ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा !
काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राकेश जाधव यांच्या कारभाराचे वाभाडे काढले होते. जाधव यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत, त्यांनी वाळू तस्करांना पाठीशी घातल्याचा आणि आर्थिक तडजोडी करून ट्रक सोडल्याचा मुद्दा वडेट्टीवारांनी लावून धरला होता. विशेष म्हणजे, या मुद्द्यावर काँग्रेसचे वडेट्टीवार यांना भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांचीही अनपेक्षित साथ मिळाली होती. “अशा अधिकाऱ्याला पाठीशी का घातले जात आहे?” असा सवाल करत मुनगंटीवारांनीही गृह विभागाला धारेवर धरले होते. सत्ताधारी आणि विरोधक एकाच अधिकाऱ्याविरोधात एकवटल्याने गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सभागृहात “तात्काळ कारवाई केली जाईल,” असा शब्द दिला होता. मात्र, अधिवेशनाचे सूप वाजताच मंत्र्यांचा तो शब्दही हवेत विरल्याचे चित्र आहे.
🍁एसपींचा ‘डिफॉल्ट रिपोर्ट’ गेला कुठे?
या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी राकेश जाधव यांच्या विरोधात पाठवलेला ‘डिफॉल्ट रिपोर्ट’ (Default Report). पोलीस दलात ‘डिफॉल्ट रिपोर्ट’ हा अत्यंत गंभीर मानला जातो. वरिष्ठांनीच आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्याच्या वर्तणुकीवर ठपका ठेवून कारवाईची शिफारस करणे, ही साधी बाब नाही. एसपी सुदर्शन यांनी जाधव यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवत, त्यांच्यावर कठोर कारवाईची शिफारस करणारा अहवाल गृह विभागाला सादर केला होता. नियमानुसार, अशा अहवालानंतर संबंधित अधिकाऱ्यावर निलंबन किंवा खात्यांतर्गत चौकशीची मोठी कारवाई अपेक्षित असते. मात्र, इतके दिवस उलटूनही हा अहवाल मंत्रालयातील कोणत्या टेबलावर धूळखात पडला आहे, हे एक कोडेच आहे.
🌻कारवाई की केवळ ‘बदली’ची मलमपट्टी?
सध्या पोलीस वर्तुळात चर्चा आहे की, या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी जाधव यांची केवळ ‘बदली’ करून प्रकरण रफादफा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, विजय वडेट्टीवार आणि सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केवळ बदलीची नव्हे, तर ‘निलंबनाची’ मागणी केली होती. “गुन्हा गंभीर असताना केवळ जागेत बदल कशासाठी?” हा प्रश्न आजही कायम आहे. जर एसपी स्तरावरून निगेटिव्ह रिपोर्ट जातो, तर गृह मंत्रालय कोणाच्या दबावाखाली कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.
🍁गृहराज्यमंत्र्यांच्या शब्दाची किंमत काय?
गृहराज्यमंत्री पंकज भोयर हे विदर्भातीलच नेते आहेत. त्यांनी आपल्याच भागातील लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर सभागृहात दिलेले आश्वासन पाळले न गेल्याने, त्यांच्या राजकीय वजनावरही चर्चा सुरू झाली आहे. “मंत्री महोदयांनी दिलेला शब्द तत्काळ मातीत मिळवला,” अशी टीका आता उघडपणे होत आहे. अधिकाऱ्यांचे ‘वरदहस्त’ इतके भारी आहेत का की मंत्र्यांचा शब्दही त्यांच्यापुढे फिका पडतो?
🌻पुढील दिशा काय? 👉राकेश जाधव यांच्यावर कारवाई न झाल्यास पुन्हा एकदा हे प्रकरण तापण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वीच इशारा दिला आहे की, जर कारवाईत चालढकल झाली तर ते रस्त्यावर उतरतील. दुसरीकडे, सुधीर मुनगंटीवार या प्रकरणात पुढे काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. मात्र, तूर्तास तरी “सैया भए कोतवाल, तो डर काहे का” या उक्तीप्रमाणे ब्रम्हपुरीतील खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्याचा रुबाब कायम असल्याचेच दिसत आहे.
जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून आणि लोकप्रतिनिधींच्या मागण्यांना केराची टोपली दाखवून, गृह विभाग नक्की काय साध्य करू पाहतोय, याचे उत्तर येणारा काळच देई
ल.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

ल.