Thursday, April 16, 2026
HomeBreaking Newsमोठी बातमी : पद्मापूर च्या जंगलात सापडलं AK-47 चं जिवंत काडतूस; नक्षलवादी...

मोठी बातमी : पद्मापूर च्या जंगलात सापडलं AK-47 चं जिवंत काडतूस; नक्षलवादी हालचाली की शिकारी टोळी?

चंद्रपूर -(सुशांत घाटे)

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेला लागून असलेल्या पद्मापूर गावाजवळच्या जंगलात आज सकाळी एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या भागात शौचालयास गेलेल्या एका इसमास AK-47 या अत्याधुनिक रायफलचे जिवंत काडतूस  सापडल्याने संपूर्ण जिल्ह्यात आणि पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. प्रतिबंधित आणि केवळ सुरक्षा दलांकडे असणाऱ्या या शस्त्राचे काडतूस सामान्य जंगलात आले कुठून, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

काय आहे नेमकी घटना?

​मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पद्मापूर गावाच्या शिवारातील जंगलात शौचालयास गेलेल्या एका इसमास   जमिनीवर एक धातूची वस्तू पडलेली दिसली. जवळ जाऊन पाहिल्यास ते एका अत्याधुनिक बंदुकीचे जिवंत काडतूस असल्याचे लक्षात आले.  सदर व्यक्तीने तातडीने याची माहिती स्थानिक पोलीस प्रशासनाला दिली आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने मोठे प्रश्नचिन्ह!

​हे काडतूस 7.62x39mm कॅलिबरचे असून ते प्रामुख्याने रशियन बनावटीच्या AK-47 किंवा तत्सम स्वयंचलित रायफलमध्ये वापरले जाते. चंद्रपूर जिल्हा हा नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असल्याने आणि यापूर्वीही काही भागात नक्षलवादी हालचालींच्या चर्चा असल्याने, या घटनेकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

  • नक्षलवाद्यांचा वावर? नजीकच्या जंगलात नक्षलवाद्यांची ये-जा वाढली आहे का?
  • शिकारी टोळ्या सक्रिय? वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी अत्याधुनिक शस्त्रांचा वापर करणारी टोळी या भागात सक्रिय आहे का?
  • सुरक्षा दलाची चूक? की हे काडतूस एखाद्या सराव दरम्यान किंवा गस्ती दरम्यान सुरक्षा दलाच्या जवानाकडून चुकून पडले?

पद्मापूर आणि परिसरातील शेतकरी व गावकरी या घटनेमुळे हादरले आहे.जंगलात अजूनही अशा प्रकारचे साहित्य किंवा शस्त्रे दडवून ठेवलेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, परिसरातील कोम्बिंग ऑपरेशन वाढवण्याची मागणी होत आहे.

हे जिवंत काडतूस नेमके कोणाचे आणि कशासाठी आणले होते? ‘डेली पोस्टमार्टम’ या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणार आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!