Tuesday, November 24, 2026
HomeBreaking Newsऑपरेशन किडनी': चंद्रपूर पोलिसांचा ऐतिहासिक 'मास्टरस्ट्रोक'; दिल्ली ते तमिळनाडू व्हाया कंबोडिया!

ऑपरेशन किडनी’: चंद्रपूर पोलिसांचा ऐतिहासिक ‘मास्टरस्ट्रोक’; दिल्ली ते तमिळनाडू व्हाया कंबोडिया!

‘ऑपरेशन किडनी’: चंद्रपूर पोलिसांचा ऐतिहासिक ‘मास्टरस्ट्रोक’; दिल्ली ते तमिळनाडू व्हाया कंबोडिया!

चंद्रपूर -( सुशांत घाटे ) 30 डिसेंबर 2025

महाराष्ट्राच्या नकाशावर चंद्रपूर जिल्हा आजवर कोळसा खाणी आणि ताडोबाच्या वाघांसाठी ओळखला जात होता. पण गेल्या पंधरा दिवसांत चंद्रपूर पोलिसांनी जी कामगिरी करून दाखवली आहे, तिची दखल केवळ राज्यानेच नाही, तर देशातील मोठ्या तपास यंत्रणांनीही घेतली आहे.एखाद्या बॉलिवूड सिनेमाला शोभेल असा हा थरार आहे.

एका गरीब शेतकऱ्याच्या लाचारीचा फायदा घेणाऱ्या सावकाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या हाती चक्क मानवी अवयवांची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचे धागेदोरे लागले आहेत.

​चंद्रपूर पोलिसांच्या ‘स्थानिक गुन्हे शाखा’ आणि ‘नागभीड पोलीस’ पथकाने लावलेला हा तपास आता दिल्ली, चेन्नई ओलांडून श्रीलंका आणि कंबोडिया पर्यंत पोहोचला आहे. गरिबांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांच्या शरीराची चिरफाड करणाऱ्या या रॅकेटचा पर्दाफाश करून चंद्रपूर पोलिसांनी इतिहास घडवला आहे.

🍁कर्ज, कफन आणि एक किडनी!या खळबळजनक प्रकरणाची सुरुवात झाली नागभीड तालुक्यातून, चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक (SP) मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध सावकारीला चाप लावण्यासाठी मोहीम उघडली होती. याच दरम्यान एका शेतकऱ्याची व्यथा पोलिसांच्या कानावर आली. हा शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली इतका दबला होता की, सावकारांचे पैसे फेडण्यासाठी त्याच्याकडे जमिनीचा तुकडाही उरला नव्हता.

​त्याला एक ‘ऑफर’ देण्यात आली – “कर्ज फेडायचे असेल, तर तुझी किडनी विक.”
पोटाची आग आणि सावकाराचा तगादा यापुढे हतबल झालेल्या त्या शेतकऱ्याने होकार दिला. त्याला वाटले की हा व्यवहार गुप्त राहील आणि आपले कर्ज फिटेल. पण त्याला कल्पनाही नव्हती की, तो ज्या दलालांच्या नादी लागला आहे, ते साधेसुधे गुन्हेगार नसून मानवी रक्ताची चटक लागलेले आंतरराष्ट्रीय गिधाडं आहे.

​​जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा खोलात जाऊन तपास केला, तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. कागदपत्रांमध्ये फेरफार करून, खोटी नाती निर्माण करून हा किडनी प्रत्यारोपणाचा खेळ सुरू होता. एसपींच्या लक्षात आले की, हे प्रकरण फक्त सावकारीचे नाही, तर एका मोठ्या ‘ऑर्गन ट्रॅफिकिंग सिंडिकेट’चे आहे.

‘मिशन सायलेंट’ आणि एसआयटी (SIT) ची स्थापना
​प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने एक विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले. हे ‘ऑपरेशन’ इतके गुप्त ठेवण्यात आले की,  याची भनक कोणालीही लागू दिली नाही. उद्देश स्पष्ट होता – मासे नाही, तर मगरमच्छ पकडायची होती.
​पोलिसांच्या सायबर सेलने जेव्हा संशयितांचे मोबाईल रेकॉर्ड्स आणि लोकेशन ट्रेस केले, तेव्हा नकाशावरदिल्ली आणि तमिळनाडू या दोन राज्यांमध्ये लाल दिवे लुकलुकू लागले. हे रॅकेट अतिशय हाय-प्रोफाईल पद्धतीने चालवले जात होते. डोनरला विमानाने प्रवास, पंचतारांकित हॉटेल्समध्ये मुक्काम आणि मोठ्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया… हे सर्व पोलिसांच्या नजरेतून सुटले नाही.

💢पांढऱ्या कोटातील ‘कसाई’ –

​गेल्या आठवड्यात चंद्रपूर पोलिसांच्या दोन तुकड्या विमानाने दिल्ली आणि तमिळनाडूसाठी रवाना झाल्या. स्थानिक पोलिसांच्या मदतीने एकाच वेळी दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले.
​तमिळनाडू कनेक्शन:एका पथकाने तमिळनाडूच्या ‘भिलाई नगर’ येथे छापा टाकला. तिथून डॉ. राजरत्नम गोविंदस्वामी याला उचलण्यात आले. दक्षिण भारतात किडनी रॅकेटमधील हे एक मोठे नाव मानले जाते. दिल्ली कनेक्शन: त्याच वेळी, दुसऱ्या पथकाने राजधानी दिल्लीतून डॉ. रविंद्रपाल सिंह याला अटक केली.

​हे दोन्ही डॉक्टर वैद्यकीय क्षेत्राला लागलेला कलंक ठरले आहेत. रुग्णांचे प्राण वाचवण्याची शपथ घेणाऱ्या या हातांनी पैशाच्या हव्यासापोटी गरिबांच्या शरीराचा बाजार मांडला होता. पोलीस तपासात उघड झाले की, हे डॉक्टर एजंट्सच्या माध्यमातून डोनर आणि रिसीव्हर (रुग्ण) यांची जुळवाजुळव करायचे आणि शस्त्रक्रियेसाठी लाखो रुपये उकळायचे.

💢कंबोडियाचा काळा अध्याय – परदेशातून सूत्र हलतात?
​या डॉक्टरांच्या अटकेने रॅकेटची साखळी तुटली असली, तरी मुख्य सूत्रधार अजूनही पडद्याआड आहे. आणि इथेच या कथेला एक भयानक वळण मिळते. पोलीस तपासाची दिशा आता कंबोडिया  कडे वळली आहे.
​सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीचे मुख्य नियंत्रण कक्ष  भारतात नसून कंबोडिया किंवा श्रीलंकेत असण्याची दाट शक्यता आहे. सध्या कंबोडिया हे ‘सायबर स्लेव्हरी’ आणि ‘ह्युमन ट्रॅफिकिंग’चे जागतिक केंद्र बनले आहे.

​चंद्रपूर पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. पण लढाई अजून संपलेली नाही. डॉ. राजरत्नम आणि डॉ. रविंद्रपाल हे केवळ प्यादे असू शकतात. खरा ‘राजा’ कंबोडियात बसून अजूनही हा खेळ खेळत असेल तर?
​चंद्रपूर पोलिसांसमोर आता आव्हान आहे ते म्हणजे या साखळीच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्याचे. पोलीस कोठडीत  डॉक्टरांकडून जी माहिती मिळेल, त्या आधारे येत्या काही दिवसांत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
​चंद्रपूरकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की, त्यांच्या पोलिसांनी केवळ एका गुन्ह्याचा तपास केला नाही, तर माणुसकीला काळीमा फासणाऱ्या एका मोठ्या षडयंत्राचा अंत केला आहे.
​”गुन्हेगार कितीही हाय-टेक असो किंवा सात समुद्रापार असो, खाकी वर्दीचा हात त्यांच्या कॉलरपर्यंत पोहोचलाच म्हणून समजा,” असा संदेशच या कारवाईतून दिला गेला आहे.
​

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!