चंद्रपूर: सुशांत घाटे
महाराष्ट्र राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक डॉ. छेरिंग दोरजे यांच्या तीन दिवसीय चंद्रपूर दौरा आणि पोलीस ठाण्यांची त्यांनी घेतलेली अचानक ‘झडती’ यामुळे संपूर्ण जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. कामात कुचराई करणाऱ्या आणि केवळ ‘वसुली’लाच आपले परम कर्तव्य मानणाऱ्या अधिकाऱ्यांची डॉ. दोरजे यांनी चांगलीच खरडपट्टी काढली असून, या कारवाईमुळे कर्तव्यात कसूर करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
भद्रावती ठाणेदार पारधींना ‘सनस्ट्रोक’; सात तास सखोल चौकशी
डॉ. दोरजे यांच्या दौऱ्यातील सर्वात चर्चेचा विषय ठरले ते भद्रावती पोलीस स्टेशन. या ठिकाणी पोहोचलेल्या डॉ. दोरजे यांनी तब्बल सात तास ठाण मांडले. केवळ कागदपत्रे तपासली नाहीत, तर पोलीस कर्मचाऱ्यांपासून ते थेट ठाणेदार राजेश पारधीं पर्यंत प्रत्येकाची सखोल चौकशी केली. या दरम्यान ठाणेदारांना कामाच्या नियोजनातील त्रुटी आणि बेजबाबदार कारभारावरून डॉ. दोरजे यांनी चांगलेच फैलावर घेतले. त्यांच्या या कठोर पवित्र्यामुळे ठाणेदार पारधी यांना ‘सनस्ट्रोक’ बसल्याची चर्चा संपूर्ण पोलीस वर्तुळात रंगली आहे.
वाहतूक व्यवस्थेवर संताप, कारवाईचे संकेत
भद्रावती परिसरातील विस्कळीत वाहतूक व्यवस्थेबद्दल डॉ. दोरजे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या भागात वाढलेल्या अपघातांच्या मालिकेमुळे नागरिकांना जीव गमवावा लागत आहे, यावर त्यांनी गंभीर दखल घेतली. वाहतूक पोलीस केवळ अवैध वसुलीसाठी रस्ते अडवून बसत असल्याच्या तक्रारींचा पाढा वाचत, डॉ. दोरजे यांनी आक्रमक शब्दांत दम दिल्याची चर्चा रंगली आहे.”वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी आहे, वसुलीसाठी नाही,” असे सुनावत त्यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
डिटेक्टिव्ह ब्रांचची ‘शून्य’ कामगिरी; खरडपट्टी
केवळ वाहतूकच नव्हे, तर भद्रावतीच्या डिटेक्टिव्ह ब्रांचच्या कामगिरीबद्दलही डॉ. दोरजे यांनी तीव्र शब्दात ताशेरे ओढले आहेत. ‘शून्य’ कामगिरीचा अहवाल समोर आल्यानंतर त्यांनी संबंधित पथकाची चांगलीच कानउघाडणी केली. गुन्हा शोधण्यापेक्षा इतर कामांतच जास्त रस दाखवणाऱ्या या पथकाला डॉ. दोरजे यांनी खडे बोल सुनावले आहेत.
पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्यासमोर आव्हानांचे डोंगर
जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्यासाठी ही परिस्थिती मोठी डोकेदुखी ठरणार आहे. जिल्ह्यातील अशा वसुलीखोर आणि कामगिरी शून्य अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवणे, हे त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. आता डॉ. दोरजे यांच्या दौऱ्यामुळे अनेक भ्रष्ट आणि निष्क्रीय अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून, सूत्रांच्या माहितीनुसार, लवकरच काही अधिकाऱ्यांवरआणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.
डॉ. छेरिंग दोरजे यांच्या या ‘मिशन मोड’ कार्यपद्धतीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस दलात आता शिस्त आणि कर्तव्यदक्षतेचे वारे वाहू लागतील, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. ‘वसुली’लाच प्राधान्य देणाऱ्यांचे दिवस आता भरले असून, कठोर कारवाईच्या प्रतीक्षेत पोलीस प्रशासन आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

